Monday, January 24, 2011

दशावतार नाटक

दशावतार नाटक  
भगवान विष्णुने वेळोवेळी जगतकल्याणासाठी घेतलेल्या विविध अवतारांना एकत्रितपणे दशावतार अस संबोधले जाते. भगवान विष्णुने दहा अवतार घेतले असे मानले जाते. ते अवतार पुढीलप्रमाणे - मत्स्य, कूर्म, वराह, वामन, नृसिंह, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्की. उत्तर गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये दशावतार लोककला खुप लोकप्रिय आहे.

दशावतार नाटक हे प्रामुख्याने गावच्या मंदिरांच्या प्रांगणात वार्षिक जत्रेच्या रात्री मराठी भाषेत सादर केले जाते. देव, राक्षस, अप्सरा अशी अनेक पात्रे या नाटकामध्ये रंगविली जातात. विषेश म्हणजे स्त्री पात्रेही पुरुषच निभावतात. गोव्यात आणि सिंधुदुर्गात दशावतार नाटकाला महत्त्वाचे स्थान आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नऊ जुनी आणि प्रमुख दशावतार मंडळे आहेत. त्यात वालावलकर दशावतार मंडळ हे पहिले मंडळ मानले जाते. नाईक  मराठा समाजाचे वालावलकर गेली शेकडो वर्षे ही लोककला जिवंत ठेवण्यासाठी संघर्ष करत आहेत.

अकराव्या शतकात ही लोककला श्री श्याम नाइकजी काळे यांनी सुरु केली. दुसऱ्या एका मतप्रवाहाप्रमाणे गोरे नामक व्यक्तीने वालावल या गावात प्रथम दशावतार सादर केला. ही कला मूळ कर्नाटक राज्यातून आली असे अनेकांचे मत आहे. गेली सहाशे ते सातशे वर्षे नाईक मराठा समाजाचे कलाकार दशावतार नाटकांमध्ये विविध भुमिका पार पाडत आहेत. सुरुवातीच्या काळात सारस्वत ब्राह्मण समाज आणि नाईक मराठा समाजाने दशावतार कला जिवंत ठेवली. हळूहळू या कलेला लोकमान्यता मिळाली. विश्वकर्मा समाज, भंडारी समाज आणि गौड सारस्वत समाजाचे कलाकारही दशावतार गाजवू लागले. मास्टर मामा मोचेमाडकर, वालावलकर, आजगावकर, आरोलकर, खानोलकर, नेरुरकर ही काही नाईक समाजाच्या दशावतार नाटयमंडळांची नावे आहेत.

हा झाला नाईक मराठा समाजाशी निगडीत दशावताराचा इतिहास. दशावताराच्या सुवर्णयुगात सर्वच समाजाच्या लोकांनी आपला हातभार लावला पण नाईक मराठा समाजाचे योगदान मोठे होते. आज उच्चशिक्षित नाईक आणि गोमंतक मराठा समाजाला दशावतार नाटकांचा विसर पडला आहे ही खेदाची बाब आहे.

Source of Photo - http://konkan-dashavatarnatya.blogspot.com/

Source of Photo - http://konkan-dashavatarnatya.blogspot.com/

Source of Photo - http://konkan-dashavatarnatya.blogspot.com/

Source of Photo - http://konkan-dashavatarnatya.blogspot.com/

1 comment:

Nisha Mangeshkar-Kakodkar said...

अप्रतिम गेले काही दिवस मी न्यू-योर्कला होते त्यामुळे येथे भेट देण शक्य झाल नाही. आज आमोणकर काका भेटले त्यांनी नवीन लेखाबद्दल माहिती दिली. असेच लिहीत राहा.