Sunday, January 16, 2011

History of Gomantak Maratha, Nutan Maratha and Naik Maratha

गोमंतक मराठा समाज गोवा

गोवा, सिंधुदुर्ग आणि कारवार या सप्तकोकणातील भागात विविध देवालये आहेत आणि या देवालयांबरोबरच देवालयीन संस्कृती नांदत होती. जी आता पूर्वीच्या स्वरुपात अस्तित्वात नाही.
 
गोवा देवाला पडलेलं सुंदर स्वप्न पण याच गोव्यात देवालयीन नोकऱ्या करणाऱ्या विविध ज्ञातींचा विकास खुंटला होता. समाजसुधारणेची गरज होती. समाजाला नेतृत्व देण्याची गरज होती. दूरदृष्टीने समाजप्रबोधनाची गरज होती. १९१० मध्ये सर्वप्रथम हा प्रयत्न थोर समाजसुधारक राजाराम रंगाजी पैंगणकर यांनी केला. पैगणी या छोट्याशा गावात त्यांनी पहिली सभा भरवली. या पहिल्या सभेत काही महत्त्वाचे ठराव पास झाले. त्यात कलावंत, नाईक, बंदे एकत्रीकरण, मुलींची लग्ने, शिक्षणप्रसार, हुंडाबंदी आणि भविष्यात विधवापुनर्विवाह करण्यास मदत करावी हे महत्वाचे ठराव होते. २६ डिसेंबर १९१७ साली काकोडे येथे मराठा गायक समाजाची स्थापना झाली. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष गोविंद पु. हेगडे देसाई होते. १९१८ मध्ये मराठा गायक विद्यार्थी सहाय्यक मंडळाची स्थापना झाली. पुढील काही वर्षे गोव्यातील विविध गावांत मराठा गायक समाजाच्या सभा पार पडल्या. १९२५ साली नागेशी येथे गायक मराठा पोर्तुगीज शिक्षण प्रसारक समाज या संस्थेची स्थापना सखारामपंत रामनाथकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

गायक मराठा पोर्तुगीज शिक्षण प्रसारक समाजाने २० व २१ मे १९२९ रोजी ऐतिहासिक अशी प्रागतिक मराठा सामाजिक परिषद भरवली. समाज एकीकरणाचा हा पहिला मोठा प्रयत्न होता. खुद्द महात्मा गांधी यांनी या परिषदेस संदेश पाठविला होता. परिषदेसाठी सावंतवाडी, रत्नागिरी, मुंबई, कारवार, हुबळी, बेळगाव अशा विविध ठिकाणाहून समाजाचे प्रतिनिधी आले होते. १६ जुलै १९३७ साली गोमंतक मराठा समाज मुंबईची गोवा शाखा स्थापन झाली. काही काळ चालली आणि नंतर बंद पडली. १९५९ साली प्रागतिक मराठा समाज या संस्थेचे नाव बदलून "गोमंतक मराठा समाज" गोवा हे नाव ठेवले. यानंतर मात्र आजतागायत "गोमंतक मराठा समाज" गोवा हे नाव कायम राहिले.

गोमंतक मराठा समाजाने आज एवढी प्रगती केली आहे की त्यांचे नाव गोव्यातील इतर पुढारलेल्या समाजा बरोबरीने घ्यावे लागेल. कोणतेही आरक्षण नाकारून ही प्रगती झाली हे विशेष. गोमंतक मराठा समाज हा गोवा, सिंधुदुर्ग आणि कारवार येथे आढळतो तसेच मुंबई, बडोदा, इंदोर, ग्वाल्हेर येथेही स्थलांतरीत झाला आहे. या समाजातील अनेक कुटुंब आज परदेशात स्थायिक आहेत. अमेरिका, इंग्लंड, इंडोनेशिया, जपान, चीन, ऑस्ट्रेलिया यादेशातून अनेक लोकांनी आमच्याशी संपर्क साधला आहे.  नाईक  मराठा, नूतन मराठा आणि कोकणी मराठा - सिंधुदुर्ग 

  गोवा, सिंधुदुर्ग आणि कारवार या सप्तकोकणातील भागात विविध देवालये आहेत आणि या देवालयांबरोबरच देवालयीन संस्कृती नांदत होती. जी आता पूर्वीच्या स्वरुपात अस्तित्वात नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही देवालयीन संस्कृतीचे मूळ होते. ही संस्कृती किती जुनी होती हे सांगण फार कठीण आहे. पण मुलनिवासी समाजाची मंदिरे प्राचीन आहेत. त्यानंतर ११००-१२०० दरम्यान सारस्वत समाजाला कदंब काळात सिंधुदुर्गात सुभेदारी मिळाली त्यांनी स्वत:ची स्वतंत्र मंदिरे उभारली.

  गोवा आणि सिंधुदुर्ग मधील देवालयीन संस्कृती मध्ये थोडा फरक होता. येथिल बरीच मंदिरे ही मराठा आणि सारस्वत समाजाच्या ताब्यात होती. गोव्याप्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही देवालयीन नोकऱ्या करणाऱ्या विविध ज्ञातींचा विकास खुंटला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातली समाजसुधारणा ही बरीच जुनी आहे. समाजात रोटी-बेटी व्यवहार व्हायचा पण पोटजातीत होत नसे, त्यासाठी समाजसुधारणेची गरज होतीच. दीडशे वर्षापूर्वी निवती किल्याचे तत्कालीन किल्लेदार बाळोजी नाईक परुळेकर यांनी उरली सुरली अंधश्रद्धा समाजातून नष्ट करण्यासाठी जोरदार मोहीम छेडली. त्यांना त्यांचे बंधू भोर संस्थानचे सरदार नाईक परुळेकर यांची मदत होती. किल्लेदार बाळोजी नाईक परुळेकर यांना त्यांच्या घरातूनच विरोध झाला. त्यांच्या घरातील काही स्त्रियांनी अंधश्रद्धेपोटी त्यांना विरोध केला. हा विरोध सहन न झाल्याने त्यांच्या हातून स्वत:च्याच कुटुंबाची हत्या झाली. या प्रकाराने इंग्रजी शासन घडबडून जागे झाले. हत्येच समर्थन करता येत नाही त्यामुळेच कडक इंग्रजी शासनाने त्यांना फाशीची शिक्षा दिली. फाशीपुर्वी त्यांनी स्वत:च्या हातातील तलवार वेताळाच्या हातात देण्याची आणि मंदिरात भजन करण्याची शेवटची इच्छा प्रकट केली. इंग्रजानी ती मान्य केली.

  ह्या प्रकारानंतर इंग्रज शासनाने स्थानिक समाजसुधारकांच्या मदतीने नवीन कायदे केले. या समाजसुधारकांच्या नामावलीत रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर यांचे नाव बरेच वरचे आहे. परमवीरचक्राची निर्मिती करणाऱ्या सावित्रीबाई खानोलकर लिहितात की, "He initiated a campaign against the Temple artist system custom. It was mainly thanks to him that a law was passed by the British India in this respect. He encouraged villagers by arranging for their tutions and crusading in favor of laws to better the community."

  रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर यांनी १८९२ साली जोरदार समाजसुधारणा मोहीम हाती घेतली. जुन्या लोकांनी सुरू केलेली ही मोहीम त्यांनी यशस्वीरित्या पुढे चालवली. सावंतवाडी संस्थानचे (सावंतवाडी, वेंगुर्ला,डिचोली,पेडणे,कुडाळ आणि मळेवाड) तत्कालीन पोलिटिकल एजंट कर्नल नट यांच्या सल्यानुसार त्यांनी प्रथम शिक्षणप्रसारावर भर दिला. मठ येथे त्यांनी बहुजनांसाठी धर्मशाळा स्थापन केली. रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर हे हिंदूपंचायत आणि स्वामी देशराज धर्मशाळा (प्रार्थना मंदीर) या संस्थांचे कित्येक वर्षे अध्यक्ष होते. १९०३ ला मठ (पूर्वीचे सावंतवाडी संस्थान) ता. वेंगुर्ला येथे स्वखर्चाने शाळा सुरू करून सर्व समाजातील गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सोय करून दिली. बहुजन विद्यार्थांना त्यांनी अनेक शिष्यवृत्ती दिल्या. रायसाहेबांचे धाकटे बंधू कै. विठ्ठल धोंडजी खानोलकर यांनी स्वत:ला समाजसेवेस वाहून घेतले. त्यांनी डॉ. खानोलकर हायस्कूल बांधले.

  रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर यांच्या प्रेरणेने १९२७ मध्ये नूतन मराठा हितवर्धक संघाची स्थापना झाली. " न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते " (या जगात ज्ञानाएवढ पवित्र दुसर काही नाही) हे संघाचे घोषवाक्य ठरले. अनेक महान व्यक्तिमत्वांनी रायसाहेबांच्या नेतृत्वाखाली संघाचे कार्य केले. यात अ.ब.वालावलकर(कोकण रेल्वेचे जनक), डॉ. विष्णू रा. खानोलकर, डॉ. प्रकाश धो. खानोलकर (एम.डी.), गुरुवर्य नि.बा.नेरुरकर, रावसाहेब डॉ. लक्ष्मण गोपाळ मठकर, शं. वि. परुळेकर, डॉ. शंकर मठकर, रावसाहेब मधुसूदन विष्णू खानोलकर, डॉ. रा.गं.खानोलकर, दादा वालावलकर (द ग्रेट रॉयल सर्कस), रा.ज.वालावलकर(उद्योगपती) यांचा व अनेक इतर कार्यकर्त्यांचाही समावेश होता.

  सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकत्रीकरणाच्या दृष्टीने फारसे प्रयत्न झाले नाहीत तरी कालांतराने सर्व पोटजातीत विवाह होऊ लागले. "कालाय तस्मै नम:" पण याचा दुष्परिणाम म्हणून समाज एकाच छत्राखाली संघटीत न होता तो विविध संस्थांत विभागला गेला. म्हणून समाज जरी एकच असला तरी तो नूतन मराठा, नाईक मराठा, कोकणी मराठा आणि गोमंतक मराठा अशा विविध नावांनी ओळखला जावू लागला. समाजसुधारक रा. गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांचेही नाव समाजसुधारकांच्या यादीत बरेच वरचे आहे. त्यांनी मुंबईतील आणि सिंधुदुर्गातील आपल्या समाजाला खूप मदत केली. त्यांच्या या कार्याचा गौरव प्रो. रा ना वेलिंगकर यांनीही केला होता. १६ ऑक्टोबर ई.स. १९२६, या दिवशी विजयादशमीच्या मुहूर्तावर रा. गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांनी नाईक मराठा मंडळ या संस्थेची स्थापना केली. आज संस्थेला ८३ वर्षे पूर्ण झाली असून संस्थेची वाटचाल यशस्वीरीत्या चालू आहे. समाजातील वधु-वरांसाठी विनामूल्य स्वरुपात "वधु वर सूचक केंद्र" नाईक मराठा मंडळातर्फे चालविले जात आहे. आपल्या समाजाने इतर समाजाना मदतीचा हात दिला. यात काही नाव विसरता येणार नाहीत. सुभेदार मेजर विष्णू परुळेकर यांनी अनेक गरीबांना मदतीचा हात दिला. एका गरीबाची जमीन लिलावात विकत घेऊन ती त्यालाच परत केली. डॉ. रामचंद्र परुळेकर, डॉ. श्रीहरी खानोलकर, डॉ. घोलेकर या तिघांनी वेंगुर्ला पंचक्रोशीत दिवस रात्र न बघता वैद्यकीय सेवा पुरवली. आजही अनेक जुनी लोक त्यांच्या सेवेचं गुणगान गातात.             

  केवळ शिक्षणाच्या आणि बुध्दीच्या जोरावर आपल्या समाजाने जी प्रगती केली ती अनेकांसाठी अभ्यासाचा विषय आहे. नाईक आणि नूतन मराठा समाज हा सिंधुदुर्ग, कारवार आणि रत्नागिरी येथे आढळतो तसेच मुंबई, बडोदा, पुणे आणि बेळगाव येथेही स्थलांतरीत झाला आहे. या समाजातील अनेक कुटुंब आज परदेशात स्थायिक आहेत. अमेरिका, इंग्लंड, इंडोनेशिया, जपान, चीन, ऑस्ट्रेलिया यादेशातून अनेक लोकांनी आमच्याशी संपर्क साधला आहे.  2 comments:

  Venkatesh Toraskar said...
  This comment has been removed by the author.
  dilip sawale said...

  Good information.