Wednesday, March 16, 2011

सिंधुदुर्गातील समाजाचे सुवर्णयुग

सध्याचे युग हे आपल्या समाजाचे सुवर्णयुग म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सर्व क्षेत्रात आपला समाज पुढे आहे. या यशस्वी वाटचालीमागे अनेकांचे प्रयत्न होते त्याची आठवण ठेवणे हे आपले परमकर्तव्य आहे. शिक्षणाचा समाजामधील प्रसार हे या यशस्वी वाटचालीमागील प्रमुख कारण आहे. साधारणतः ६०० ते ७०० वर्षापुर्वी अनेक समाज सिंधुदुर्गात स्थायिक झाले. नंतर पुन्हा पोर्तुगिज राजवटीत काही प्रमाणात स्थलांतर झाले. सिंधुदुर्ग (म्हणजे तत्कालिन रत्नागिरी जिल्हा आणि सावंतवाडी राज्य) च्या वरवडे, खानोली, मठ, वेंगुर्ला, वालावल, तेंडोली, पाट, परुळे, चेंदवन, नेरुर या गावांमध्ये वेगवेगळया समाजाचे  लोक स्थायिक झाले. दोन्ही वेळा बाहेरून आलेल्या सारस्वत समाजाने आणि काही प्रमाणात मूळ निवासी असलेल्या मराठा समाजाने आपली मंदिरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांधली. काही मंदिरे ही त्याहूनही जुनी आहेत. ती शैव संप्रदायाची असावीत. या मंदिरांबरोबरच देवालयीन संस्कृतीचा आरंभ झाला.  

गोव्यात पोर्तुगिज शासन आणि १८०० पर्यंत सिंधुदुर्गात मराठा शासन आणि नंतर इंग्रजांची सत्ता होती. इंग्रजी सत्तेच्या काळात खऱ्या अर्थाने आपल्या समाजाचा विकास झाला. अनेक महत्वाच्या शासकिय आणि लष्करी पदांवर समाजाचे लोक आसीन झाले. समाजाच्या लोकांनी मंदिराच्या नोकऱ्या सोडल्या. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी जुन्या रुढी परंपरा मोडून काढत समाजाच्या विकासाला चालना दिली. अनेक नवीन कायदे झाले. 

निवतीचे किल्लेदार बाळोजी नाईक परुळेकर यांनी प्रथम परुळे येथिल समाजाला नवी दिशा दिली. शिक्षण महर्षी रायसाहेब डॉक्टर रामजी धोंडजी खानोलकर यांनी समाजप्रबोधन केले. शिक्षणसंस्थेची स्थापना मठ सारख्या गावात केली. प्राथमीक आणि माध्यमिक शिक्षणाची सोय केवळ आपल्या समाजासाठीच नव्हे तर सर्वच समाजासाठी केली.  त्यांच्या पुढच्या पिढीने समाजासाठी कार्य सुरूच ठेवले. गोव्यात गोमंतक मराठाची स्थापना होण्यापुर्वी सिंधुदुर्गात समाज प्रभोधन चालू होत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या समाजात रोटी-बेटी व्यवहार हा बराच जुना आहे. ब्रिटीश आणि त्यांचे कठोर कायदे समाजाच्या प्रगतीचे आधारस्तंभ बनले. अनेक प्रतिभावंत तयार झाले. सुभेदार मेजर  विष्णु सखाराम  परुळेकर, रावसाहेब लक्ष्मण गोपाळ मठकर, डॉ. रामचंन्द्र परुळेकर, डॉ. श्रीधर खानोलकर, डॉ. घोलेकर, मुंबईचे समाजसेवक डॉ. वामन शंकर मठकर, उद्योजक वालावलकर  यांचा त्यात समावेश होतो.

१६ ऑक्टोबर ई.स. १९२६, या दिवशी विजयादशमीच्या मुहूर्तावर रा. गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांनी नाईक मराठा मंडळ या संस्थेची स्थापना केली. आज संस्थेला ८३ वर्षे पूर्ण झाली असून संस्थेची वाटचाल यशस्वीरीत्या चालू आहे. समाजातील वधु-वरांसाठी विनामूल्य स्वरुपात "वधु वर सूचक केंद्र" नाईक मराठा मंडळातर्फे चालविले जात आहे. असंघटीत आणि दुर्लक्षित समाजाला एकत्र करण्यासाठी मुंबईमध्ये १९२७ मध्ये नुतन मराठा हितवर्धक संघाची स्थापना करण्यात आली. हा संघ समाजातील गरीबांना मदतीचा हात देतो. शिष्यवृत्ती देतो. अनेकांनी या मदतीचा लाभ घेतलाय. नंतरच्या काळात अनेक छोटी मोठी मंडळे स्थापन झाली आणि नाहीशी पण झाली. पण त्यांनी केलेल कार्य अजरामर राहील. नाईक मराठा मंडळ आणि  नुतन मराठा हितवर्धक संघ हे सध्या कार्यरत आहेत.

गरज आहे ती सर्व समाजाच्या लोकांनी एका विशाल छत्राखाली एकत्र येण्याची.
धन्यवाद.

No comments: