सध्याच्या जगात सर्वात मोठे प्रदूषण कोणते? माझ्या मते विचारांचे आणि आचारांचे प्रदूषण हे सध्याच्या जगातील सर्वात मोठे प्रदूषण आहे. जिकडे पहाल तिकडे हे प्रदूषण आहे. विचार एक आणि आचार वेगळाच. दिखावू विचार काय कामाचे? जर योग्य कृती केली नाही तर त्या विचारांना आणि वाचाळतेला काही महत्व राहत नाही. आपले बरेच नेते पहा ना फार मोठी मोठी आश्वासने देतात. पाळतात किती? पुरोगाम्यांची तीच परीस्थिती. महापुरुषांच्या विचारांची होळी करण्याचा विडाच काहीजणांनी उचलला आहे. महापुरुषांचे भिंतीवर लावलेले फोटो हे दिखाव्यासाठीच असतात. जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना भाषणे द्यायची आणि मग सगळे विसरुन जायचे.
आपण जे बोलतो ते प्रत्यक्षात किती आणतो? भ्रष्टाचारावर दररोज टीका होते, सर्वचजण टीका करतात, पण भ्रष्टाचार कमी होत नाही. अण्णा हजारे यांनी कृती केली त्यामुळे आज देश त्यांच्या मागे उभा आहे. कित्येक नेते सभेत जातीयतेवर कठोर टीका करतात पण ज्यावेळी कृती करण्याची वेळ येते तेव्हा सगळे विचार बाजूला पडतात. मी जातीयवाद दूर झाला पाहिजे आणि समानता आली पाहिजे याच विचाराचा आहे. पण यासाठी सर्वच समाजाच्या लोकांची साथ हवी. त्याशिवाय जातीयता कशी दूर होणार? आमचा हा नवीन ब्लॉग एका समाजाचा असला तरी जातीयवादी नाही. एकत्र येऊन प्रगती करण आणि त्याचबरोबर सर्वच समाजाच्या लोकांना सहकार्य देण हा आमचा विचार आहे. अर्थात गेली कित्येक वर्षे आमच्या समाजाची माणस सर्वच समाजांसाठी आणि देशासाठी योगदान देत आहेत. विज्ञान, आरोग्य, देशसेवा, भारतीय सेना, गायन, वादन, संगीत, शास्त्रीय संगीत, न्यायदान, साहित्य, चित्रपट, कला, समाजसेवा, राजकारण, शिक्षण, तंत्रज्ञान अशा सर्वच क्षेत्रात आमच्या समाजाने योगदान केल आहे आणि करत राहील.
माझ्या मते जोपर्यंत आपण स्वतः पुढे येउन स्वतःचे विचार आचारात रुपांतरीत करत नाहीत तोपर्यंत जग बदलण्याचे स्वप्न बघण्यात अर्थ नाही. महापुरुषांचे विचार जर आपल्या बुध्दीला पटत असतील तर ते जरुर आचरणात आणावे. केवळ बोलुन काहीच फायदा नाही. हा ब्लॉग ही आमची कृती आहे. अजूनही बरेच विचार कृतीत उतरवण बाकी आहे अर्थात त्यात अनेक लोकांच्या मार्गदर्शनाची गरज आहे.
सुमंत मुळगावकर, लीला मुळगावकर, डॉ. रायसाहेब आर. डी. खानोलकर, डॉ. वसंत रामजी खानोलकर, डॉ. व्ही.एन. शिरोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, किशोरी आमोणकर यासारखे अनेक आदर्श आपल्याकडे आहेत ज्यांनी नेहमी आपले विचार सत्यात उतरवले. समाजासाठी आणि देशासाठी कार्य केले. त्यांनी त्यांचे विचार आचारात आणले त्यामुळे त्यांनी प्रचंड प्रगती केली. "अलसस्य कुतो विद्या?" तर मग चला चांगल्या विचारांचा संकल्प करा आणि हे विचार आचरणात आणा.
No comments:
Post a Comment