Saturday, May 21, 2011

संकुचित जातीयवाद नको

ही कोकणस्थ मराठा समाज महासंघ ब्लॉगसाईट चालू करताना माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट उद्देश होता तो म्हणजे आपला विखुरला गेलेला समाज एकत्र करणे,  समाजाची माहिती एकत्रित करणे, ज्ञानमय समाजाची निर्मिती करणे, मानवी जीवनाचा विकास साधणे ,मानवता बंधुता आणि समता साधणे.  महाराष्ट्रातील विविध चळवळीचा इतिहास बघितला तर तो फारसा समाधानकारक दिसत नाही. नक्की काय साध्य करायचे आहे हे जोपर्यंत स्पष्ट नसत तो पर्यत चळवळ यशस्वी होणं कठीण असत. सध्या महाराष्ट्रात जातीयवादी संघटना विषारी प्रचार करताना दिसत आहेत. यात केवळ द्वेष आणि द्वेषच दिसतो. दुसऱ्या जातीचा आणि समाजाचा द्वेष करायचा, त्यांच्या महान लोकांची अवहेलना करायची, निंदानालस्ती करायची हा एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवून काही संघटना काम करताना दिसतात. कुठल्याही संघटनेचा मूळ उद्देश हा सध्याच्या वर्तमान स्थितीत असलेल्या समाजाचा विकास करणं हाच असतो. पण नंतर या संघटना भरकटत जातात.

हे सगळ लिहीण्याच कारण हे की मी जो फेसबुक ग्रुप तयार केलाय आणि जो ब्लॉग चालवत आहे त्याची दिशा पक्की करण गरजेच आहे. मी संकुचित जातीयवादाच्या पूर्णपणे विरोधात आहे. सर्व जाती आणि समाजाच्या लोकांना आमच व्यासपीठ खुल आहे पण त्यांचा स्वीकार करण्यापुर्वी त्यांची पूर्ण माहिती घेण मला गरजेच वाटत याला अनेक कारणे आहेत. सध्या काही कट्टर संघटना अतिशय खालच्या स्तराला गेल्या आहेत. या संघटनांचे अनुयायी दुसऱ्या संघटनांमध्ये शिरून स्वत:च्या विकृत विचारांचा प्रचार करण्यात धन्यता मानतात. अशा सर्व लोकांसाठी आमच्या ब्लॉग आणि ग्रुपचे दार कायम बंद राहील हे लक्षात घ्यावे. अतिशय खालच्या स्तराला गेलेल्या काही संघटना स्वत:ची पुस्तके छापून त्यात दुसऱ्या समाजाची एवढी निंदानालस्ती  करत आहेत कि त्याला काही अंत नाही. एका पुस्तकाने एवढी खालची पातळी गाठली की ब्राह्मण स्त्रीयांवर अतिशय अश्लिल भाषेत लिखाण केल आहे. एवढच नव्हे तर जातीय दंगली कशा पेटवायच्या आणि बहुजन समाजाला यात कस ओढायचं याच विस्तृत लिखाण या विकृत लोकांनी केल आहे. आपल्याला अशा लोकांपासून सावध रहावे लागेल. तसेच काही संघटना इतर समाज कसे मागासलेले राहतील याच्याच मागे असतात. त्यात अपप्रचार आला, इतिहासाची मोडतोड आली. काही महाभाग तर समाजसुधारकांची गरजच नव्हती. समाजसुधारक हे इंग्रजांचे एजंट होते असा अपप्रचार करत आहेत. खर तर इतिहास हा जो खरा असेल तसा लिहिला गेला पाहिजे. इतिहासातून बोध घेऊन काय चुकल हे तपासून पाहून वर्तमानात प्रगती करायची असते. जर इतिहासातल्या चुका वगळल्या तर आपण शिकणार काय? प्रत्येक समाज हा आपल्याला  सोयीस्कर होईल असा इतिहास लिहिण्यात गुंतला आहे. असेच चालू राहिले तर भारतीय इतिहास हा जगाच्या दृष्टीने थोतांड ठरेल. इतिहासात रमून जाणारे भविष्यात कधीच प्रगती करत नाहीत. इतिहास हा बोध घेणे आणि मोठया  व्यक्तींचा आदर्श घेऊन मार्गक्रमण करणे इतपत मर्यादित असावा अस मला वाटत. आपण इतिहासातच जर रमलो तर वर्तमानात कृती कधी करणार आणि भविष्यात प्रगती करणार याचा सर्वांनी विचार करावा.    

आपल्या समाजाने कधीही संकुचित विचार केला नाही आणि करणारही नाही. वैचारिक आणि सामाजिक लढा चालूच राहील पण त्याची विकृती कधीही होणार नाही याला कारण म्हणजे आतापर्यंत जेवढे महामानव आपल्या समाजात तयार झाले त्यांनी विशाल दृष्टिकोन ठेवला. आपण कधीच एका समाजाविरुद्ध लढा लढला नाही. आपला लढा होता तो एका सनातनी विचारधारेविरुध्द होता. आपल्या समाजाच्या विकासाबरोबरच अखिल मानवी जीवनाचा विकास करण्यात ते यशस्वी झाले. याला अनेक उदाहरणे आहेत गोव्याचे माजी मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांनी सर्वच समाजाच्या विकासाला प्राधान्य दिले. ज्यावेळी गोमंतक मराठा समाज गोव्याची स्थापना झाली तेव्हा होतकरू विद्यार्थ्यांना जी शिष्यवृत्ती दिली जाणार होती त्यात त्यांनी इतर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठीही विशेष तरतूद करून ठेवली. गोव्याच्या माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांनीही तोच वारसा पुढे चालवला. आपल्या समाजाने उभारलेल्या गोव्यातील १५ शिक्षणसंस्था आणि आपल्या सिंधुदुर्गातील समाजाने उभारलेल्या १० शिक्षणसंस्था संपूर्ण मानवी समाजाला शिक्षित करण्याच पवित्र काम करत आहेत. रायसाहेब डॉ. आर. डी. खानोलकर यांनी सर्व समाजासाठीच शाळा स्थापन केल्या. या शाळांमध्ये सारस्वतही शिकले, मराठेही शिकले आणि ब्राम्हणही शिकले. डॉ. रामचंद्र परुळेकर यांनी खेड्यापाड्यातील जनतेची दिवसरात्र सेवा केली. लीला मुळगावकर यांच सामाजिक कार्य एका समाजासाठी मर्यादित नव्हत. मंगेशकरांनी उभारलेल इस्पितळ अखिल मानव जातीची सेवा करतंय. सांगण्याचा उद्देश हाच की आपला समाज कधीही जातीय संकुचित विचारात अडकला नव्हता किंवा अडकणार देखील नाही. उलट अशी विचारधारा ठेवणाऱ्या स्वकीय आणि इतरांविरुद्ध आवाज उठवत राहील आणि पुन्हा एकदा स्पष्ट करतो की अशा सर्व लोकांसाठी आमच्या ब्लॉग आणि ग्रुपचे दार कायम बंद राहील. गरज आहे ती सर्व समाजातील विद्वान लोकांनी एकत्र होऊन समाजाला योग्य दिशा देण्याची आणि भूतकाळात न रमता भविष्यकाळात जर भारताला खरोखरच महासत्ता बनवायचे असेल तर त्या दृष्टीने प्रयत्न करण्याची.    

धन्यवाद.    

4 comments:

महेश मंगेशकर said...

बरोबर आहे तुझ वामन. हा सगळा जातीय लढा महाराष्ट्राला पुन्हा २०० वर्ष मागे घेऊन जाईल असे वाटतय. अर्थात आपल्यासारख्या लोकांनीच याला विरोध केला पाहिजे.

Vishwas Marathe (विश्वास मराठे) ) said...

दुसऱ्या समाजाचा व्देष करून कधीच प्रगती करता येत नाही. प्रगती साठी समाजसुधारणा करणे गरजेच आहे आणि त्यासाठी उच्चशिक्षण घेणे तेवढेच महत्वाचे. पूर्वीचे विसरून जाऊ गेल्या ५० वर्षात सर्वांना समान संधी होती त्यावेळी इतर समाजांनी प्रगती का केली नाही याचा विचार त्यांनी करणे गरजेचे आहे. आमचा समाज गेल्या ७० वर्षात एवढी प्रगती करू शकला, २५ पद्मश्री,पद्मभूषण,पद्मविभुषण आणि भारतरत्न मिळवू शकला, रायसाहेब आणि रावसाहेब हे खिताब मिळवू शकला तर त्याला समाजातील महान व्यक्तींची दूरदृष्टी आणि शिक्षणाचा ध्यास कारणीभूत आहेत. लेखं चांगला झाला.

Nilkanth Joshi said...

Waman Tuzya ya upkramas maze aashirwad. Ji pragati Samajane keli aaahe tyala samajatil sarv mahan vyaktimatva karanibhut aahet. Tya sarvanchi mahiti ya blogvar yavi hi iccha aahe. A.B.Walawalkar Siranch ek pustak mazyakade aahe te mi tula deto.... keep it up..

Waman Parulekar said...

सर्वप्रथम प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. मंगेशकर आणि मराठे सर् आपण आपली ओळख येथे करून दिली तर आम्हाला आनंद होईल. नीलकंठजी तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . अ.ब्.वालावलकर यांनी बरीच पुस्तके लिहिली आहेत. जर ती उपलब्ध झाली तर मला आनंदच होईल.
धन्यवाद