Tuesday, May 31, 2011

आद्य शिवचरित्रकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर

(मराठीतील आद्य शिवचरित्रकार आणि नाईक मराठा मंडळाचे संस्थापक गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांच्या कार्यावर लेखक संजय सोनवणी यांनी लेख लिहिला होता. त्यांची पूर्वपरवानगी घेऊन मी हा लेख येथे पुर्नप्रकाशीत करत आहे. संजय सोनवणी यांनी मराठीत ६२ पुस्तके लिहिली आहेत. "डेथ ओफ द प्राईम मिनिस्टर" हे त्यांचे पुस्तके खूप गाजले. ते सामाजिक कार्यकर्ते पण आहेत.)


२० ऑगस्ट १८६० साली केळुस या वेंगुर्ल्यातील गावी जन्मलेले कृष्णराव अर्जुन केळुसकर हे मराठीतील आद्य शिवचरित्रकार आहेत हे सहसा सामान्य वाचकांना माहीत नसते. तत्पुर्वी महात्मा फुलेंचा महाराजांवरील पोवाडा आणि राजारामशस्त्री भागवतलिखित एक लहानसे चरित्र एवढेच काय ते मराठीत प्रसिद्ध झाले होते. तत्पुर्वीच लोक. टिळक १८९५ पासून शिवस्मारकासाठी देणग्या गोळा करण्याच्या प्रयत्नात होते व त्यातुनच एक समग्र शिवाजी महाराजांचे साक्षेपी, संशोधनात्मक असे चरित्रही प्रसिद्ध करण्याचा केसरीकारांचा उद्देश होता. परंतू तरीही महाराष्ट्रातील विद्वानांकडुन शिवचरित्र लिहिण्याचे काम झाले नाही.

याबद्दल "छत्रपती शिवाजी महाराज" या आपल्या ग्रंथाच्या १९०७ च्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेत केळुस्कर गुरुजी म्हणतात-" मराठयांचे नाव जगाच्या इतिहासात अजरामर करुन ठेवणा-या ह्या महाप्रतापशाली राष्ट्रीय वीराच्या अतुल पराक्रमांचे विस्तृत वर्णन स्वतंत्र चरित्रलेखनाच्या रुपाने करण्याच्या कामी महाराष्ट्रातील मोठमोठ्या विद्वान ग्रंथकारांकडुन आळस अथवा अनास्था का झाली हे कळत नाही. आधुनिक विद्याचार संपन्नतेच्या काळी स्वदेश,स्वराज्य इत्यादिकांविषयी सदोदित विचार प्रकट करणा-या पंडितांकडुन नुसता तोंडाने अभिमान प्रकट करण्यापलीकडे काहीच होउ नये हे चमत्कारिक दिसते. दुस-यांच्या स्वातंत्र्याचा अपहार करणा-या किंवा स्वदेशाचा नाश करण्यास प्रवृत्त होणा-या अनेक पुरुषांची चरित्रे मराठी भाषेत प्रसिद्ध व्हावीत, आणि ज्या प्रौढप्रताप वीरमणीने स्वदेशास स्वातंत्र्य मिळवून देण्याचे सुयश संपादिले त्याचे सविस्तर चरित्र लिहिण्याची स्फुर्ती कोणासही होवू नये यास काय म्हणावे?"

या खंतीवरून शिवचरित्राबाबत केवढी अनास्था होती हे कळुन येते. कोणीही अन्य विद्वान पुढे न आल्याने १९०३ च्या दरम्यान केळुसकरांनी "छत्रपती शिवाजी महाराज" हे चरित्र लिहिण्यास घेतले. संशोधकाची शिस्त पाळत त्यांनी तत्कालीन उपलब्ध सारी कागदपत्रे, बखरी, पत्रव्यवहार तपासत त्यांनी मोठ्या कष्टाने प्रस्तुन चरित्र संपन्न केले. आपले संशोधन/चरित्र हे तरीही परिपुर्ण आहे, अंतिम आहे असा त्यांचा, ख-या इतिहाससंशोधकाप्रमाणे दावा नव्हता. त्यांनी याच प्रस्तावनेत स्पष्टपणे म्हटले आहे कि-

"(लेखकाला) ज्या गोष्टी आज सत्य वाटल्या व ज्या क्रमाने त्या घडल्या अशी त्याची खात्री झाली, त्या गोष्टी त्या क्रमाने त्याने प्रस्तुत ग्रंथात नमूद केल्या आहेत. अनेक पंडितांचे इतिहाससंशोधनाचे काम सांप्रत चालू आहे. त्यांचे शोध जगापुढे आल्यावर प्रस्तुत चरित्रलेखात दुरुस्ती करावी लागेल हे उघड आहे."

या चरित्रग्रंथाची पहिली आवृत्ती १९०७ साली मराठा प्राविडंड फंडातर्फे प्रसिद्ध झाली. या आवृत्तीला शाहु महाराज यांनी मदत केली. कागल, बडोदा संस्थानांनी पारितोषिके दिली. वाचकांनीही या आवृत्तीचे उदार स्वागत केले. जवळपास ६०० प्रुष्ठांचा हा शिवेतिहास होता. यात केळुस्करांनी अत्यंत समतोल आणि प्रवाही भाषेत, प्रत्येक ठिकाणी उपलब्ध पुरावे देत, घटनांचे विश्लेषन करत हा ग्रंथ सिद्ध केला आहे. इतिहास-चरित्र कसे लिहिले जावे याचा हा एक आदर्श वस्तूपाठच होय. त्यामुळे विद्वत्जनांतही या ग्रंथास एक अपरंपार असे महत्व निर्माण झाले.

तत्पुर्वी केळुसकरांनी "फ्रांसचा जुना इतिहास", ग्रीक तत्वज्ञ "सेनेका व एपिक्टेटस यांची बोधवचने" हे प्रसिद्ध ग्रंथ लिहिले तर होतेच पण गौतम बुद्ध आणि तुकाराम महाराजांचे विस्तृत चरित्रही लिहिलेले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रथम गौतम बुद्ध समजले आणि अनिवार आकर्षण निर्माण झाले ते केळुस्करांच्या गौतम बुद्धाच्या चरित्रामुळेच. याशिवाय त्यांनी "आध्यात्मिक ज्ञानरत्नावली" या १८९४ साली लक्ष्मण पांडुरंग नागवेकर यांनी सुरू केलेल्या मासिकात गीतेवर असंख्य ग्रंथांचा आधार घेत तत्वज्ञानात्मक टीकाही लिहिली. पुढे ही टीका पुस्तकरुपानेही प्रसिद्ध झाली.

यावरून केळुस्करांचे प्रकांड पांडित्य आणि अविरत संशोधन सिद्ध होते. परंतु "छत्रपती शिवाजी महाराज" हे शिवचरित्र त्यांच्या प्रकांड जिज्ञासेचे, साक्षेपी संशोधनाचे मुर्तीमंत प्रतीक आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.

हे चरित्र आधी हिंदी व गुजराती भाषेत अनुवादित होवुन प्रसिद्ध झाले. इंग्रजी आवृत्तीमुळे शिवरायांना जगभर पसरवण्याचा त्यांनी ध्यास घेतला. शिवाय शिवाजी महाराजांची नवी उपलब्ध माहिती घेवुन मुळ ग्रंथात सुधारणा करून नवी आवृत्तीही प्रसिद्ध करायला घेतली. मनोरंजनकार कै. का. र. मित्र यांच्या छापखान्यात दोन्ही ग्रंथांची छपाईही झाली. पण या उद्योगात त्यांना प्रचंड कर्ज झाले. दोन्ही ग्रंथ छापुन झाले खरे पण ते कर्जाच्या विळ्ख्यात अडकले. त्यांच्या मित्रांनी हे कर्ज फेडण्यासाठी धडपड सुरू केली.

ही वार्ता इंदोर संस्थानचे अधिपती सवाई तुकोजीराव होळकर यांच्या कानी गेली. त्यांनी तत्कालीन रु. २४०००/- (आज ही रक्कम ८० लाख रुपयांच्या आसपास जाईल) देवून केळूसकरांना कर्जमुक्त तर केलेच पण इंग्रजी आव्रुत्तीच्या ४००० प्रती घेवून जगभरच्या मुख्य इंग्रजी ग्रंथालयांना मोफत वाटल्या व शिवराय चरित्र जगभर पसरवले. याच होळकरांनी शिवस्मारकालाही देणगी दिली. ज्या काळात एकही शिवप्रेमी/वंशज केळुसकरांना वा स्मारकाला मदत करायला पुढे सरसावले नाही त्या काळात जवळपास आजच्या भाषेत कोटभर रुपये होळकरांनी खर्च केले यात त्यांचे शिवप्रेम दिसून येते.

या ग्रंथाच्या आजवर ७ आव्रुत्त्या प्रसिद्ध झाल्या असुन एक आवृत्ती बामसेफनेही संपादित प्रसिद्ध केली आहे. वरदा प्रकाशनाने १९९१ ते २०१० या काळात ४ आवृत्त्या प्रसिद्ध केल्या असून मुळ स्वरुप जपले आहे.

परंतु प्रा. विलास खरात संपादित, मुलनिवासी पब्लिकेशन ट्रस्ट प्रकाशित केळुसकरांच्या शिवचरित्राने मात्र अनेक प्रश्नचिन्हे उभी केली आहेत हेही येथे नमुद करणे आवश्यक आहे. कोणत्याही ग्रंथाची आव्रुत्ती प्रसिद्ध करतांना त्याचे मुळ नाव बदता कामा नये हा एक संकेत असतो तो येथे पार पाडला गेलेला नाही. "छत्रपती शिवाजी महाराज" या मुळ शिर्षकाचे नवे नामकरण "नागवंशीय छत्रपती शिवाजी महाराज" केले गेले आहे आणि हे सर्वच संकेतांना धुडकावुन लावणारे आहे.

लेखक/संशोधक/तत्वज्ञान्यांना जात नसते. केळुसकर गुरुजींबद्दल तत्कालीन विद्वानांना केवढा आदर होता हे वरदा प्रकाशनाच्या आवृत्तीत प्रसिद्ध झालेल्या (मुलनिवासीने वगळलेल्या) पुरुषोत्तम बाळक्रुष्ण कुलकर्णी यांनी करुन दिलेल्या १२-१०-१९३४ च्या लेखक परिचयातुन स्पष्ट होते. परंतु दुर्दैवाने शिवाजी महाराजांनाच जातींत अडकावु पाहणा-यांना आणि केळुसकरांच्या इतिहासलेखनपद्धतीकडे ढळढळीत दुर्लक्ष करत वाट्टेल ते खोटे रेटुन सांगणा-या, झटपट प्रसिद्धीसाठी हपापलेल्या नव्य इतिहासकारांसाठी (?) हे सांगावे लागत आहे कि केळुसकर हे मराठा समाजातीलच होते. त्यांना स्वबांधवांनी मदत केली नाही. त्यांचा इतिहास त्यांचे लेखन घरोघर पोहोचवले नाही. मदत केली ती होळकरांनी. हे ऋण मान्य न करता, केळुसकरांना त्यांचे उचित श्रेय मिळण्यासाठी कसलेही प्रयत्न न करणा-यांना, त्यांना जवळपास विस्म्रुतीत ढकलना-यांना इतिहास क्षमा करेल काय? 

- संजय सोनवणी 

4 comments:

Waman Parulekar said...

कृष्णराव केळुसकर यांच्या जीवनावर आणि इतिहास संशोधनावर बऱ्याच लेखकांनी लिहिले आहे. शक्य होईल त्या लेखकांचे लेख किंवा लेखाचा नेमका भाग मी येथे प्रसिद्ध करेन.

Waman Parulekar said...

जोतीरावांचे मित्र आणि मुंबईचे ख्यातनाम सत्यशोधक कृष्णाजी अर्जुन केळूसकर यांनी जोतीरावांच्या मृत्यूनंतर १६ वर्षांनी (मुद्रणकलेच्या शताब्दी वर्षात) 'छत्रपती शिवाजी महाराज' हा महाग्रंथ लिहून प्रसिद्ध केला. २० डिसेंबर १९०६ चे हे शिवचरित्र आजही मराठीतील एक विश्वासार्ह आणि दर्जेदार शिवचरित्र म्हणून ओळखले जाते. मराठा प्रॉव्हिडंट फंडाचे निर्माते गोविंदराव कृष्णराव दळवी यांची हे शिवचरित्र लिहिण्याची इच्छा होती; परंतु त्यांच्या अल्पायुष्यामुळे हे काम केळूसकरांवर पडले. मुंबईच्या विल्सन हायस्कूलमधील विद्वान शिक्षक असणारे केळूसकर हे मूळचे कोकणातील केळूस या गावचे. सुमारे ६८४ पृष्ठांच्या या शिवचरित्रासाठी केळूसकरांनी ४ वर्षे अपार मेहनत केली. चरित्र लेखन चालू असतानाच त्यांची पत्नी आजारी पडली. पुढे त्यांचे निधन झाले. छत्रपती शाहू महाराजांना हे शिवचरित्र फार आवडले. त्यांनी ग्रंथाला रुपये एक हजारचे बक्षीस दिले. या शिवचरित्राची भाषांतरे इंग्रजी, हिंदी व गुजराती भाषेतही झाली. ग्रंथाची सुधारित दुसरी आवृत्ती १९२० साली केळूसकरांनी प्रकाशित केली. त्यात त्यांना हजारो रुपयांचे कर्ज झाले. अशावेळी इंदूरचे राजे सवाई तुकोजीराव होळकर उदारपणे पुढे आले. त्यांनी या ग्रंथासाठी केळूसकरांना २४००० रुपयांची देणगी दिली. जगातील सर्व ग्रंथालयांना त्यांनी या पुस्तकाच्या चार हजार इंग्रजी प्रती भेट म्हणून पाठविल्या. कृष्णराव केळूसकर (जन्म २० ऑगस्ट १८६०- मृत्यू १४ ऑक्टोबर १९३४) यांनी एक खंत नमूद करून ठेवलेली आहे. 'तोंडाने शिवरायांच्या आरत्या ओवाळणारे आणि फुका अभिमान सांगणारे लोक इतिहास लेखन, संशोधन आणि शिवरायांचा मूल्यविचार रुजविण्यासाठी मात्र काहीही करीत नाहीत', अशी त्यांची स्पष्ट तक्रार होती. याचाही आज गंभीरपणे विचार होणे आवश्यक आहे. - प्रा. हरी नरके

chandramani R said...

Jya lekhakani dada keluskaranwar pustak lihile aahet tyanchy kahi pustakanche nav sangu shakta ka sir??

chandramani R said...

Jya lekhakani dada keluskaranwar pustak lihile aahet tyanchy kahi pustakanche nav sangu shakta ka sir??