Tuesday, June 14, 2011

समाजासमोरील आव्हाने आणि उद्दिष्ट्ये

गेल्या दीडशे वर्षात आपल्या समाजाने जी विस्मयकारक प्रगती केली त्या प्रगतीत अनेक संस्थांचा हात आहे. अनेक समाजसुधारकांनी जीवाचे रान करून चळवळ चालवली. या चळवळीतूनच संस्था निर्माण झाल्या. समाजसुधारणेच्या काळात या संस्थांना निश्चित अस ध्येय होत. अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी समाजात जागृती निर्माण करणे , समाजपरिवर्तन करणे. समाजातील गरजूंना मदतीचा हात देणे, त्यांच्या शिक्षणाची सोय करणे, नीतीमान समाजाची स्थापना करणे. ही आणि अनेक अन्य उद्दिष्ट्ये तत्कालीन संस्था आणि समाजधुरीणांसमोर होती. कालांतराने समाजाने न भूतो न भविष्यती अशी प्रगती केली. समाज सुधारणा झाली की संस्थाचे महत्व कमी होते असे अनेकांचे मत आहे. केवळ वर्धापनदिनी आपल्याला संस्थांची आठवण होते. आजची परिस्थिती पहाता आपल्या समाजाची अनेक स्वप्न पूर्ण झाली आहेत. आज आपण प्रगतीच्या शिखरावर आहोत. ही स्थिती अशीच कायम रहावी यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत आणि या प्रयत्नांत संस्थांच मजबुतीकरण महत्वाचे आहे. कुठलाही समाज ज्यावेळी प्रगती करतो आणि यशाच्या शिखरावर जातो त्यावेळी त्या समाजाची जबाबदारी आणखी वाढते. सध्या जी स्थिती आहे ती तशीच रहावी यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे. भावी काळात आपल्यासमोर कोणती उद्दिष्ट्ये असावीत ती मांडण्याचा प्रयत्न मी करत आहे.

१) समाजाच्या उन्नतीसाठी अनेक धुरीणांनी भगीरथ प्रयत्न केले. त्यांनी ज्याकाळात हे कार्य केले तो काळ लक्ष्यात घेता त्यांचे कार्य आपल्या समाजाच्या इतिहासात किती महत्वाचे आहे हे कळून येते. हे समाजसुधारक आपले आदर्श आहेत आणि त्यांनी केलेल्या कार्याचे स्मरण ठेवणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यांच विस्मरण ही कृतघ्नता आणि बौद्धिक दिवाळखोरी ठरेल. आपण व्यक्तिपूजा म्हणून नव्हे तर कृतज्ञता म्हणून आणि समाजासमोरील खरे आदर्श समाजाला कळावेत यासाठी लेखन करणार आहोत. पुढील काळात विस्मृतीत गेलेल्या सर्व आदर्श स्त्री पुरुषांची माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही करू. ते आमचे प्रमुख उद्दिष्ट असेल.

२) १९२९ च्या शिरोडा येथिल प्रागतिक मराठा सामजिक परिषदेनंतर आपल्या तीन राज्यात पसरलेल्या समाजाच्या संपूर्ण एकत्रीकरणाच्या दृष्टीने फारसे प्रयत्न झाले नाहीत. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या नावाने कार्यरत झाल्या. आपला मूळ समाज एक असला तरी संस्थांच्या वेगवेगळ्या नावांमुळे एकत्रीकरणाची प्रक्रिया कठीण झाली. गोमंतक मराठा, नाईक मराठा, नूतन मराठा आणि कोकणी मराठा अशा विविध नावांनी आपला समाज ओळखला जावू लागला. इतर समाजात संस्था नंतर तयार झाल्या पण आपल्याकडे प्रथम संस्था तयार झाल्या आणि नंतर समाज त्या नावाने ओळखला जावू लागला. समाजाचे संपूर्ण एकत्रीकरण हे आमचे उद्दिष्ट राहील.

३) आपल्या गोव्यातल्या समाजाने आरक्षण नाकारले. सिंधुदुर्ग आणि मुंबईतील समाजाला काही प्रमाणात आरक्षण मिळाले. काहींनी ते स्वेच्छेने नाकारले तर काहींची जातपडताळणी झाली नसल्यामुळे त्यांना आरक्षण मिळाले नाही. आरक्षणावर व्यापक चर्चेची गरज आहे आणि ती घडवून आणणे हे आमचे उद्दिष्ट्य आहे. ब्रिटीश काळात कोणत्याही आरक्षणाशिवाय आपल्या समाजाने स्वकर्तृत्वावर जी प्रगती केली ती पहाता सध्या आरक्षणाची गरज वाटत नाही. त्यामुळे जर कोणाला पोटजात लावल्यामुळे आरक्षण मिळत असेल तर त्यांनी या गोष्टीचा सखोल विचार करण्याची गरज आहे. ब्रिटीश सरकारी सेन्सस नुसार आपला समाज हा मराठा या सदराखाली यायचा. त्यामुळे ९०% लोकांच्या प्रमाणपत्रावर मराठा ही नोंद झालेली आहे. त्यामुळे केवळ आरक्षणासाठी पुन्हा मागे जायचे असल्यास ते चुकीचे ठरेल हे माझे वैयक्तिक मत आहे अर्थात मी वर म्हटल्याप्रमाणे या विषयावर व्यापक चर्चेची गरज आहे.

४) संस्था मजबुतीकरण हे आमचे ध्येय आहे. आपल्या समाजासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. त्यांची कार्यक्षेत्रे वेगवेगळी आहेत. गुरुवर्य कृष्णराव केळूसकर यांनी स्थापन केलेले नाईक मराठा मंडळ, मुंबई हे मंडळ मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समाजासाठी काम करत आहे. डॉ. रायसाहेब आर.डी. खानोलकर यांनी स्थापन केलेला नूतन मराठा हितवर्धक संघ हा १९२७ पासून कार्यरत आहे. संघाच कार्यक्षेत्र मुंबई आणि सिंधुदुर्ग हे आहे. गोमंतक मराठा समाज मुंबई हा गोव्यातून मुंबईत आलेल्या आपल्या समाजासाठी कार्यरत आहे. गोमंतक मराठा समाज गोवा ही संस्था गोव्यातील आपल्या समाजासाठी काम करत आहे. तसेच कारवारला नाईक समाज उन्नती मंडळ आहे. या सर्व संस्था आपल्या समाजासाठी काम करत आहेत. यातील निदान एका तरी संस्थेच आजीवन सदस्यत्व आपण स्वीकाराव असे मी आवाहन करतो.

५) शिक्षणाचे महत्व कधीही कमी झालेलं नाही आणि होणारही नाही. गरज आहे ती कालानुरूप योग्य क्षेत्र निवडण्याची. आपली प्रगती ही केवळ आणि केवळ शिक्षणामुळे झाली आहे हे आपण विसरून चालणार नाही. शिक्षणाचे महत्व पुढच्या पिढीला पटवून देण आणि योग्य ते मार्गदर्शन करण ही आपली महत्वाची उदिष्ट्ये असतील.
विद्यां ददाति विनयं विनयाद् याति पात्रताम् ।
पात्रत्वात् धनमाप्नोति धनात् धर्मं ततः सुखम् ॥
( अर्थात विद्या विनय देते, विनयामुळे पात्रता येते, धन ,धर्म आणि सुख या गोष्टी प्राप्त होतात.)

६) आपल्या समाजातील प्रत्येक कुटुंबाच एक कुटुंब मंडळ व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करू. अशी मंडळ तयार झाल्यास कुटुंबातील एकता वाढेल आणि पर्यायाने समाजातील एकता वाढेल. सध्या प्रयोग म्हणून आम्ही दोन परिवाराची माहिती जमा करतोय. संकेतस्थळाना जरूर भेट द्या. http://parulekars.blogspot.com/ and http://paigankar.blogspot.com/

७) शेवटच आणि महत्वाच उद्दिष्ट्य हे आहे की ग्राउंड झिरो वरील परिस्थिती समजून घेण आणि आवश्यक ते धोरण ठरवण. अजूनही आपली काही मंडळी केवळ अंधश्रध्देपोटी देवालयीन नोकऱ्या करत आहेत. तसे पाहता कोणतेही काम किंवा नोकरी ही कमी दर्जाची नसते पण केवळ तुम्ही या समाजाचे आहात म्हणून तुम्ही ही नोकरी केली पाहिजे ही विचारधारा समर्थनीय नाही. जर तुमचा दर्जा या नोकरीने वाढत असेल तर तुम्ही ती खुशाल करा पण त्यापूर्वी दहा वेळा विचार करा. जुन्या पिढीतील ग्राउंड झिरो वरील काही लोक अजूनही उच्च नीच भेद मानतात हेही समर्थनीय नाही. अर्थात या सर्वगोष्टीवर व्यापक चर्चेची गरज आहे.

महानप्येकजो वृक्षो बलवान् सुप्रतिष्ठितः ।
प्रसह्य एव वातेन शक्यो धर्षयितुं क्षणात् ॥

- वामन राधाकृष्ण परुळेकर

No comments: