Saturday, July 2, 2011

आरक्षणाशिवाय प्रगती करता येते

आरक्षणाशिवाय प्रगती करता येते या विधानाशी मी ठाम आहे. गोव्यातील गोमंतक मराठा समाजाला आरक्षण मिळणे शक्य होते. कित्येक वर्षे ज्या समाजाचा मुख्यमंत्री शासन करत होता त्या समाजाला आरक्षण मिळवणे सहज शक्य होते. पण स्वाभिमानी गोमंतक मराठा समाजाने आरक्षण पूर्ण नाकारले. आम्हाला आमच्या प्रगतीसाठी कुठल्याही कुबड्यांची गरज नाही हे ठणकावून सांगितले. गोमंतक मराठा समाजाची आजची गोव्यातली परिस्थिती पाहता हे सिद्ध झाले आहे की स्वत:च्या कष्टांनी आणि बुद्धीच्या जोरावर प्रगती करता येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाईक मराठा, नूतन मराठा आणि कोकणी मराठा समाजालाही आरक्षण नाही. परंतु समाजातील एका पोटजातीला मात्र आरक्षण आहे. पण या पोटजातीची लोकसंख्या फार कमी आहे. नाईक मराठा किंवा नूतन मराठा समाज जो कागदोपत्री मराठा आहे त्यांनी कोणत्याही आरक्षणाशिवाय आजचे दिवस पाहिले आहेत आणि याचा त्यांना अभिमान आहे. 

ब्रिटीश काळात तर गोष्टच वेगळी होती. देवालयीन संस्कृतीतील  कोणत्याही पोटजातीला आरक्षण नव्हत. आरक्षणाशिवाय वयाच्या २०व्या वर्षी रायसाहेब खानोलकर डॉक्टर झाले. विष्णू सखाराम परुळेकर ब्रिटीश सेनेत सुभेदार मेजर झाले. विष्णूपंत खानोलकर, रामचंद्र परुळेकर, विक्रम खानोलकर, श्रीधर खानोलकर, घोलेकर, श्रीधर खानोलकर, गंगाधर परुळेकर, मधुसूदन खानोलकर डॉक्टर झाले. अ ब वालावलकर कोकण रेल्वेचे जनक झाले. विक्रम खानोलकर मेजर जनरल झाले आणि अशी अनेक उदाहरणे आहेत. खानोलकर, पैगनीकर, वेलिंगकर, नेरुरकर, अणावकर आणि मठकर यांनी शिक्षणाची गंगाच कोकणात  आणली म्हणून बहुजन समाजाला शिक्षणाचा परिसस्पर्श झाला आणि तिथूनच प्रगतीची घौडदौड सुरु झाली आहे हे सर्वांनी मान्य केलं पाहिजे. त्यावेळी या थोर समाजसुधारकांनी जे कष्ट घेतले ते समाजाने कायम लक्षात ठेवावेत. समाज स्वयंपूर्ण व्हावा हा त्यामागचा हेतू होता.

इतर समाजाला मिळत असलेल्या आरक्षणाविषयी मी मान्य करेन कि दलित समाजास आरक्षणाची गरज होती पण आता मात्र त्यांना आरक्षणाची गरज आहे असे मला वाटत नाही. आपल्या समाजाला मात्र कधीही आरक्षणाची गरज नव्हती, आताही नाही आणि पुढेही राहणार नाही आणि याला कारण आपल्या समाजसुधारकांनी केलेले कार्य आणि उभारलेल्या शिक्षणसंस्था. ज्या शिक्षणसंस्थेत शिक्षणाची समान संधी सर्वांना होती. गरज आहे ती आहेत त्या शिक्षण संस्था मजबूत करण्याची, समाजातील विद्यार्थ्यांना उपलब्ध वसतीगृहे अद्ययावत करण्याची आणि शिष्यवृत्ती देण्याची. ज्या एका पोटजातीला महाराष्ट्रात आरक्षणाचा फायदा मिळतोय त्यांनी स्वत:हून तो नाकारावा आणि मुख्य प्रवाहात सामील व्हावं. आमचा उद्देश सर्व समाजाला एकाच मुख्य प्रवाहात आणण्याचा आहे. भेदाभेद नकोत.

दुसरा मुद्दा असा कि आपला समाज मराठा या सदरात येत असल्याने आपल्याला आरक्षणाविषयी चर्चा करण्याची गरज आहे. आज मराठा समाजातील काही लोक आरक्षणाची मागणी करत आहेत. जर भविष्यात ही मागणी मान्य झाली तर आपल्याला म्हणजेच जे महाराष्ट्रात कागदोपत्री मराठा आहेत त्या सर्वाना हे आरक्षण लागू होईल. खर तर अशा कोणत्याही आरक्षणाची आपल्याला गरज नाही त्यामुळे ठामपणे हे आरक्षण नाकारावे लागेल. जर सर्वच समाजाना आर्थिक निकषांवर आरक्षण मिळत असेल तर गोष्ट वेगळी पण केवळ जात या निकषांवर आरक्षण मिळत असेल तर त्याला माझा विरोध राहील.    

अर्थात वरील सर्व मते ही माझी वैयक्तिक मते आहेत या मतांशी कदाचित आपण सहमत नसाल. आपली प्रतिक्रिया या लेखावर जरूर द्या. आपल्या भविष्याचा विचार आपणच करणार आहोत. धन्यवाद.

हे  पण वाचा. -->> संकुचित जातीयवाद नको

1 comment:

निलेश काकोडकर said...

वामनजी पूर्ण सहमत ..