Monday, July 11, 2011

साधनाताई यांना भावपूर्ण श्रद्धांजली

साधनाताई यांना भावपूर्ण श्रद्धांजली
जेष्ठ समाजसेविका आणि बाबा आमटे यांच्या सहचारिणी साधनाताई आमटे यांच शुक्रवारी आनंदवन येथे निधन झाल. निधनासमयी त्या ८५ वर्षाच्या होत्या. आनंदवनातील बाबा आमटे यांच्या "श्रद्धावन" या समाधीस्थळावरच रविवारी साधनाताई यांना समाधी देण्यात आली. गेले काही महिने त्यांच्यावर उपचार चालू होते पण या उपचारांना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता आणि त्या कोमात गेल्या होत्या.
साधनाताई यांचा जन्म ५ मे १९२६ ला नागपूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णशास्त्री घुले. पुढे बाबा आमटेंशी त्यांच लग्न झाल आणि त्या साधनाताई आमटे झाल्या. बाबा आमटेंच्या समाजसेवेत त्यांनीही स्वत:ला वाहून घेतलं. समाजाने वाळीत टाकलेल्या कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन उभारलं. त्यांनी आपले आयुष्य कुष्ठरोग्यांच्या सेवेत खर्च केलं. रुढी परंपरेच्या विरुद्ध त्यांनी लढा उभारला आणि कुष्ठरोग्यांना न्याय मिळवून दिला. साधनाताईंच "समिधा" हे आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे. हे आत्मचरित्र मराठी आणि हिंदी भाषेत उपलब्ध आहे. आपण ते जरूर वाचावे. साधनाताईंच्या जीवनापासून प्रेरणा घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. साधनाताई या सर्व समाजसेवकांसाठी खऱ्या अर्थाने आदर्श आहेत. आपण ज्या समाजात जगतो त्या समाजाप्रती आपली सामजिक बांधिलकी असते ह्या सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून जे काही शक्य असेल ते समाजासाठी करणे गरजेचे आहे. आपल्या आयुष्यातील थोडा वेळ मानवी समाजाच्या हितासाठी बाजूला काढला तर ती खरी श्रद्धांजली ठरेल. 
   

No comments: