Sunday, June 8, 2014

गोमंतक मराठा समाज गोवा - संक्षिप्त इतिहास

गोमंतक मराठा समाज गोवा  -  संक्षिप्त इतिहास (तारीखवार तपशील)

प्रत्येक चळवळीचा स्वतःचा असा इतिहास असतो. कधी कधी काही व्यक्तींची चरित्रेच सामाजिक चळवळीचा इतिहास बनतात. गोमंतक मराठा समाज गोव्याचे आद्य समाजसुधारक राजाराम रंगाजी पैगीणकर यांचे चरित्र वाचल्यावर मला याची जाणीव झाली. समाजाचे एक कार्यकर्ते किशोर पैगीणकर काका यांनी मला पुस्तके पाठवली. गेल्या भेटीत मी माझा उद्देश गोमंतक मराठा समाज गोव्याच्या काही कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सांगितला होता. आपल्या ब्लॉगवर आणि ग्रुपमध्ये गोमंतक मराठा समाज गोव्याचे अनेक सदस्य आहेत. त्यांना हा संक्षिप्त इतिहास तारखेसह जाणून घ्यायचा आहे. तसेच मी राजाराम पैगिणकर, कृष्णराव फातर्पेकर, मोतीराम जांबावलीकर, एन ए मराठे कारवारकर या गोमंतक मराठा समाज गोव्याच्या समाजसुधारकांनी केलेल्या कार्यावर स्वतंत्र लेख लिहिणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समाजावर एक विस्तृत लेखं लिहीत आहे अर्थात त्याला बराच वेळ लागेल कारण सिंधुदुर्गात झालेली समाजसुधारणा ही बरीच जुनी आहे त्यामुळे संदर्भ मिळणे कठीण होत आहे.

गोव्यातील आपल्या समाजाला खऱ्याअर्थाने कुणी जागृत केले असेल तर ते राजाराम रंगाजी पैगीणकर यांनी. त्या काळात समाजसुधारणेसाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे भगीरथ प्रयत्न म्हटले तरी वावगे ठरणार नाही. राजाराम रंगाजी पैगीणकर यांचा लढा हा स्वाभिमानाचा लढा होता. प्रस्थापितांच्या विरुध्द बंड होत. राजाराम रंगाजी पैगीणकर यांनी सर्वप्रथम समाजाच्या एकीकरणाला प्राधान्य दिले. गोव्यातील समाज विविध पोटजातीत विभागला गेला होता. या एकीकरणासाठी राजाराम पैगीणकर यांनी दिवस रात्र एक केला. प्रसंगी अपमानही सहन केला. गोव्यातल्या विविध गावांचे दौरे केले. त्या काळात एका गावातून दुसऱ्या गावात जाण आज वाटत तेवढ सोप नव्हत. पैंगीण हे गोव्याच शेवटच टोक आहे आणि त्या काळी उपलब्ध दळणवळणाची साधने लक्ष्यात घेता प्रवास करण म्हणजे त्याकाळी द्रविडी प्राणायाम होता. अशा काळात राजाराम पैगीणकर यांनी केलेल्या कार्याला विशेष महत्व प्राप्त होत. त्यांना समाजाबद्दल कळकळ होती. त्यांच्याकडे विलक्षण नेतृत्वक्षमता होती. दूरदृष्टी होती. स्वाभिमानी बाणा होता. त्यामुळेच त्यांचे नाव गोमंतक मराठा समाज गोव्याच्या चळवळीत खूप वरचे आहे.

१) राजाराम रंगाजी पैगीणकर यांनी २ ऑक्टोबर १९१० रोजी पहिली सभा पैंगीण या गावी भरविली. या सभेची तयारी राजाराम पैगीणकर आणि गोपाळ जांबवलीकर यांनी पंचमहलात फिरून केली होती. त्यामुळे बरीच गर्दी जमल्याची नोंद आहे. या पहिल्या सभेत काही महत्त्वाचे ठराव पास झाले. त्यात कलावंत, नाईक, बंदे एकत्रीकरण, मुलींची लग्ने, शिक्षणप्रसार, हुंडाबंदी आणि भविष्यात विधवापुनर्विवाह करण्यास मदत करावी हे महत्वाचे ठराव होते. येथे राजाराम रंगाजी पैगीणकर यांची दूरदृष्टी दिसते. शिक्षणाने प्रगती साधता येते याची त्यांना पूर्ण जाणीव होती. त्याशिवाय शिक्षणाने उत्पन्नाची नवीन साधने शोधता येतील याची त्यांना खात्री होती. त्यामुळे समाजातील तरूण स्त्री पुरुषांनी शिकावं ही त्यांची इच्छा होती. हुंडाबंदी आणि विधवापुनर्विवाह हे ठराव आधुनिक सामाजाच्या निर्मितीसाठी महत्वाचे होते. समाजबांधवांकडून ६० रुपये निधी जमा केला.   

२) पैंगीण येथिल सभा यशस्वी झाल्यावर पंचमहलातील पहिली जाहीर सभा गोपाळराव जांबावलीकर यांच्या अध्यक्षतेखाली ८ ऑक्टोबर १९११ म्हणजे जवळपास एका वर्षाच्या अंतरानंतर जांबवली येथे भरली. १२ ऑक्टोबरला काकोडा, १४ ऑक्टोबर पर्वत, १५ ऑक्टोबर फातर्पे आणि १७ ऑक्टोबरला कुर्डी अशा झंझावाती सभा झाल्या.

३) पंचमहलातील सभा यशस्वी झाल्यावर राजाराम पैंगिणकर यांनी मुंबईस जाण्याचा निर्णय घेतला. मुंबईस जाऊन तेथील समाजाची मदत घ्यावी हा त्यामागील हेतू होता. ३१ डिसेंबर १९११ रोजी मुंबईत नितीवर्धक समाजची स्थापना झाली. या सभेस राजाराम पैंगिणकर आणि सीताराम पैंगिणकर हजर होते. डॉ. लक्ष्मणराव धारगळकर यांनी अध्यक्षस्थान भूषविले. पण राजाराम पैंगिणकर यांच्या मुंबई मोहिमेस फारसे यश मिळाले नाही. त्याला कारण मुंबईतील बरेच लोक स्वतःला या समाजाचे म्हणवून घ्यायला तयार नव्हते. पण राजाराम पैंगिणकर निराश न होता गोव्यास परतले आणि पुन्हा जोमाने समाजकार्य सुरू केले. गावोगावी जाण, लोकांच्या भेटी घेण, त्यांना एकीकरणाचे फायदे समजावून सांगण हे काम चालूच होत. या कार्यात उत्स्फुर्त्पणा होता. या दरम्यान राजाराम पैंगिणकर यांनी समाजातील गरीब मुलांना मदतीचा हात दिला. त्यांच्या शिक्षणाची सोय केली.

४) १९१३ मध्ये मुंबईत रघुवीर पैंगिणकर यांनी कलावंत समूह नावाची संस्था स्थापन केली. पण ही संस्था अल्पजीवी ठरली.

५) २६ डिसेंबर १९१७ साली काकोडे येथे मराठा गायक समाजाची स्थापना झाली. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष गोविंद पु. हेगडे देसाई होते. १९१८ मध्ये मराठा गायक विद्यार्थी सहाय्यक मंडळाची स्थापना झाली. पुढील काही वर्षे गोव्यातील विविध गावांत मराठा गायक समाजाच्या सभा पार पडल्या.

६) १९२५ साली नागेशी येथे गायक मराठा पोर्तुगीज शिक्षण प्रसारक समाज या संस्थेची स्थापना सखारामपंत रामनाथकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याच दरम्यान मुंबई, रत्नागिरी आणि सावंतवाडी येथे विविध चळवळी चालू होत्या. १९२६ ला मुंबईत नाईक मराठा मंडळाची स्थापना झाली. १९२७ ला नूतन मराठा हितवर्धक संघाची स्थापना झाली आणि १९२९ साली बालक संरक्षण मंडळ आणि विद्यार्थी मंडळ यांच एकीकरण होऊन गोमंतक मराठा समाज मुंबईची स्थापना झाली.

७) ऐतिहासिक प्रागतिक मराठा सामाजिक परिषद, शिरोडा 
गायक मराठा पोर्तुगीज शिक्षण प्रसारक समाजाने २० व २१ मे १९२९ रोजी ऐतिहासिक अशी प्रागतिक मराठा सामाजिक परिषद भरवली. समाज एकीकरणाचा हा पहिला मोठा प्रयत्न होता. खुद्द महात्मा गांधी यांनी या परिषदेस संदेश पाठविला होता. परिषदेसाठी सावंतवाडी, रत्नागिरी, मुंबई, कारवार, हुबळी, बेळगाव अशा विविध ठिकाणाहून समाजाचे प्रतिनिधी आले होते. केवळ आपल्याच समाजाचे नव्हे तर सारस्वत, दैवज्ञ, भंडारी समाजचे प्रतिनिधी उपस्थित होते. अनेक वृत्तपतत्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रो. रा ना वेलिंगकर यांनी अध्यक्षीय भाषणात शिक्षणाचा पुरस्कार केला. त्यांनी "नाईक मराठा मंडळ " आणि "गोमंतक विद्यार्थी मंडळ" ह्यांच्या चालकांच कौतुक केलं. या परिषदेत रा ना वेलिंगकर यांनी महत्वाचे ठराव परिषदेसमोर ठेवले. यात
१) समाजातील ऐक्य वाढवणे. २) समाजाचा एकच संघ स्थापन करून त्याची  रत्नागिरी, कारवार, गोवा आणि मुंबई अशी चार केंद्रे ठेवावीत.  ३) समाजातील मुलांना उच्च शिक्षण देणे. ४) अनिष्ट रुढी परंपरा बंद पाडणे.           

८) १९३२ मध्ये नितीवर्धक मंडळ आणि गायक मराठा पोर्तुगीज शिक्षण प्रसारक समाज या दोन संस्थांच एकीकरण करून "गोमंतक मराठा समाज गोवा " या नव्या संस्थेची स्थापना झाली. १९३२ मध्येच दुसऱ्या सभेत संस्थेच नाव बदलून "प्रागतिक मराठा समाज" हे नवीन नाव देण्यात आले.

९) १९३७- १९३९ या काळात "प्रागतिक मराठा समाज" या संस्थेसाठी निधी जमा करण्याच्या हेतूने अनेक दिग्गजांनी कार्यक्रम केले. यात दिनानाथ मंगेशकर, हिराबाई बडोदेकर आणि मोगुबाई कुर्डीकर यांचा समावेश आहे. १९४१ नंतर "प्रागतिक मराठा समाज" ही संस्था क्षीण झाली.

१०)  १६ जुलै १९३७ साली गोमंतक मराठा समाज मुंबईची गोवा शाखा स्थापन झाली. काही काळ चालली आणि नंतर बंद पडली.

११) १९५९ साली प्रागतिक मराठा समाज या संस्थेचे नाव बदलून "गोमंतक मराठा समाज" गोवा हे नाव ठेवले. यानंतर मात्र आजतागायत "गोमंतक मराठा समाज" गोवा हे नाव कायम राहिले.

१२) ४ नोव्हेंबर १९६५ साली "गोमंतक मराठा समाज" गोवा इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.

१३) १९९० मध्ये सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आणि पद्मश्री डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या शुभहस्ते राजाराम स्मृती सभागृहाचे उदघाटन झाले.

अशाप्रकारे अनेकांनी १०० वर्षापूर्वी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले. राजाराम पैगिणकर यांनी पैगीण गावातून या चळवळीचा आरंभ केला आणि पूर्णत्वाला नेली. आपण जो वाचलात तो चळवळीचा संक्षिप्त इतिहास (तारीखवार तपशील) आहे. विशेषतः यात स्थापन झालेल्या संस्था आणि त्यांचे कार्य यांचा थोडक्यात आढावा आपण घेतला.  नूतन मराठा हितवर्धक संघ आणि नाईक मराठा मंडळ या संस्था आणि त्यांचा असाच संक्षिप्त इतिहास आपण लवकरच पाहू.

संदर्भ -
  1. मी कोण ? - राजाराम रंगाजी पैगीणकर
  2. गोमंतक  प्रकृती आणि संस्कृती
  3. पुरुषार्थ - वामन राधाकृष्ण 
  4. नूतन  आणि नाईक मराठा स्मरणिके 
आणि विशेष धन्यवाद गोमंतक मराठा समाजाचे कार्यकर्ते श्री. किशोर पैगणकर यांना, ज्यांनीं मला पुस्तके उपलब्ध करून दिली आणि वेळोवेळी फोनवर मार्गदर्शन केलं.


- वामन राधाकृष्ण परुळेकर

No comments: